Wednesday, September 17, 2008

बनायचेय फुले-आंबेडकरांचा तेलुगु वारसदार

तिरुपती इथं मंगळवारी लाखो चाहत्यांसमोर चिरंजीवी आपल्या 'प्रजा राज्यम' या नव्या राजकीय पक्षाची तुतारी फुंकत असताना पार्श्वभागी भव्य मंचावर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, मदर तेरेसा आणि महात्मा जोतीबा फुले यांच्या प्रतिमा त्याच्या पक्षाची वैचारिक दिशा स्पष्ट करत होत्या.
करोडो तेलुगु चित्रपटशौकिन ज्याला रुपेरी पडद्यावर देवासमान मानतात तो 'चिरूगारू' आता सामाजिक न्याय आणि गरिबी निर्मूलनाचा अजेंडा घेऊन राजकीय आखाड्यात उतरला आहे. २०० पेक्षा जास्त तेलुगु चित्रपटांमध्ये विविध भूमिका वठवणा-या ५३ वर्षांच्या चिरंजीवीच्या या नव्या भूमिकेत अनेकांना आशेचा नवा किरण दिसत असला, तरी आंध्रातल्या प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या पायाखालची वाळू मात्र त्यामुळे सरकू लागली आहे.


चिरंजीवीच्या राजकारणातल्या एन्ट्रीमुळे २६ वषांर्पूर्वी आंध्रात अभिनयाकडून राजकारणात येऊन कलाटणी देणारे एन. टी. रामाराव यांच्या युगाची पुनरावृत्ती होईल का, प्रस्थापित राजकीय पक्षांची एकाधिकारशाही मोडून काढत करोडो चाहत्यांच्या जिवावर चिरंजीवी आंध्रातल्या बहुजनांचा नेता म्हणून पुढे येईल की बदलत्या राजकीय, सामाजिक-आर्थिक परिस्थितीत चिरूचा चार्म राजकीय आखाड्यात विरून जाईल, असे अनेक प्रश्न चर्चिले जात आहेत.


प्रादेशिक अस्मितेच्या नावाखाली तेलुगु अभिनेते एन. टी. रामाराव यांनी १९८२ साली तेलुगु देसम पक्षाची (टीडीपी) स्थापना केली. तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस पक्षाने रामाराव यांच्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते. मात्र लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये टीडीपीला मिळालेल्या घवघवीत यशाने रामाराव यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली आणि राज्यात काँग्रेसला एक मजबूत पर्याय निर्माण झाला. २६ वर्षांपूर्वी टीडीपीच्या स्थापनेच्या वेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात खूप फरक पडलाय. असं असलं तरी आंध्रातले सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, छोटे कामगार आणि महिलांचे प्रश्न आज अधिकच बिकट झाले हे मात्र खरे. दुष्काळ आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतक-यांची संख्या आंध्रात सर्वात जास्त आहे. २६ वर्षांपूर्वी आंध्रातला हाच वर्ग रामाराव यांच्या पाठीशी उभा राहिल्याने सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात आल्या होत्या. मात्र पुढे हळूहळू टीडीपीवर राज्यातल्या शक्तिशाली कम्मा (चौधरी) पुढा-यांचा प्रभाव वाढीला लागला आणि आज तो केवळ कम्मांचा पक्ष म्हणूनच ओळखला जातो. टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडूंच्या सत्तेच्या काळात राज्याची जनता किती त्रस्त झाली होती, हे २००४ सालच्या मतपेट्यांतून जाहीर झाले होतं.




आंध्र काँग्रेसवर पूवीर्पासून रेड्डी समाजाचं वर्चस्व राहिले आहे. गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवरच्या राजकारणात जमीनदार रेड्डी सक्रिय असतातच. रेड्डींचे काँग्रेसवरचे वर्चस्व आजही शाबूत आहे. या राजकीय परिस्थितीत आंध्रात ५२ टक्के असलेल्या ओबीसी वर्गासाठी एकही प्रबळ नेता सध्या राज्याच्या राजकारणात अस्तित्वात नाही. त्यामुळे या वर्गासाठी म्हणून खास पक्षासाठी एक मोठी स्पेस आंध्रच्या राजकारणात गेली अनेक वर्षे अस्तित्वात आहे. ही राजकीय पोकळी पाहता राज्याच्या वेस्ट गोदावरी जिल्ह्यातील मोगलतुरू गावात कापू (आंध्रात मुख्यत: अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, छोटे कारागीर असलेल्या कापूंची लोकसंख्या तीन कोटी आहे) या इतर मागासवर्गीय जातीत जन्मलेल्या चिरंजीवीला आंध्रच्या राजकारणात पाय रोवण्यासाठी जागा उपलब्ध असल्याचे आपल्याला दिसते.


आपल्या पहिल्यावहिल्या राजकीय संवादातच चिरंजीवीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबरोबरच महात्मा जोतीबा फुले यांचे विचार आपल्याला मार्गदर्शक राहणार असल्याचे जाहीर केले. उत्तरेतील मायावतीनंतर फुल्यांच्या विचारांशी जवळीक साधणारा दक्षिणेत चिरंजीवी हा पहिला मोठा नेता मानला जात आहे. अशाप्रकारे थेट बहुजनवादी राजकीय प्रतिकांचा वापर करून आंध्रातल्या रेड्डी आणि कम्मा जातीच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा त्याचा प्रयत्न दिसतोय. अखिल आंध्र प्रदेशात तुफान लोकप्रियता लाभलेल्या चिरंजीवीचं सर्वात मोठे बलस्थान हे त्याचे चाहते हेच आहेत. चाहत्यांनी स्थापन केलेल्या चिरंजीवी चॅरिटेबल ट्रस्ट आणि फॅन क्लबचे जाळे संपूर्ण आंध्रात पसरलेय. रक्तदान, नेत्रदान यासारख्या शिबिरांमधून लाभ घेणारे कोट्यवधी लोक या ट्रस्टशी जोडले गेले आहेत. त्यामुळे यापुढे राजकीय संघटन करताना या फॅन फौंडेशनचा चिरंजीवीला नक्कीच लाभ मिळणार आहे.


प्रस्थापित राजकीय पक्षातील एखाद-दोन मोठे बहुजन समाजातील नेते चिरंजीवीसोबत गेले, तर येत्या निवडणुकांत तो निर्णायक भूमिका बजावू शकतो, असे मत हैदराबाद विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. कांचा इलय्या यांनी व्यक्त केले आहे. राज्यात कापू समाजाची संख्या मोठी आहे. राज्यातल्या इतर मागासवगीर्यांमध्ये लोकप्रिय असलेले नवतेलंगणा प्रजा पार्टीचे देविंदर गौड चिरंजीवीसोबत जाण्याची शक्यता आहे. चिरंजीवी-गौड समीकरण तयार झाले तर आगामी निवडणुकांमध्ये किमान ९० विधानसभा तर १५ लोकसभा मतदारसंघांत चिरंजीवीचा पक्ष निर्णायक भूमिका बजावू शकेल, असे ते सांगतात.




आंध्रच्या किनारी भागातल्या ईस्ट गोदावरी, वेस्ट गोदावरी, कृष्णा, गुंटूर आणि विशाखापट्टणम् जिल्ह्यांमध्ये चिरंजीवीचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे या भागात त्याचे यश निश्चित मानले जातेय. मात्र राज्यातल्या इतर भागांतली जनता राजकीय नेता म्हणून त्याचे कसे स्वागत करील, हे आत्ताच सांगणे कठीण असले तरी त्याच्यावर त्याचे राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे.




आपण स्वत: पक्के मानवतावादी असून राजकारणात प्रवेश करण्यासाठी आपल्याला माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी प्रेरित केले असल्याचे तो सांगतो. मात्र तामिळनाडूत एम. जी. रामचंदन, करूणानिधी, जयललिता व आंध्रात रामाराव या लोकप्रिय अभिनेत्यांना राजकारणात मिळालेल्या यशामुळे दक्षिणेतल्या स्टार्सना राजकारणात येण्याचा मोह आवरता येत नाही, हे स्पष्टच आहे. डॉ. कलामांकडून प्रेरणा घेऊन आणि फुले-आंबेडकरी विचारांना मार्गदर्शक मानणा-या चिरंजीवीला आंध्रात मोठ्या संख्येने असलेल्या मुस्लिम आणि दलित मतदाराचा पाठिंबा मिळेल का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुख्यत: हैदराबाद शहरात प्रभावी असलला मजलिसे इत्तेहादुल मुस्लेमिन पक्ष आणि राज्यात तुरळक भागात कार्यरत बसपा, कम्युनिस्ट पक्षांकडे या मतदारांचा झुकाव आहे. त्यामुळे हे दोन वर्ग आपल्याकडे ओढण्यात तो कितपत यशस्वी होईल, याच्यावर बरेच काही अवलंबून आहे. राज्यातल्या काँग्रेस आणि टीडीपीला पर्याय म्हणून तिसरी आघाडी निर्माण करण्यासाठी कम्युनिस्टांनी दोस्तीचा हात आधीच पुढे केलेला आहे. हे पक्ष या आघाडीचे नेतृत्व चिरंजीवीकडे द्यायलाही तयार होऊ शकतात.




चिरंजीवीने आपल्या पक्षाची ध्येयधोरणे जाहीर करताना महत्त्वाच्या विषयांवर स्पष्ट मत जाहीर केलेले नाही. तिरुपतीच्या सभेत त्याने सामाजिक न्याय प्रस्थापित करून राज्यात बोकाळलेला राजकीय भ्रष्टाचार संपवण्याचे आश्वासन दिलेय. मात्र धगधगता स्वतंत्र तेलंगणाचा मुद्दा आणि डोकेदुखी ठरलेला आंध्रातला नक्षलवाद या राज्याच्या राजकारणात ज्वलंत मानल्या जाणा-या मुद्यांना त्याने परत बगल दिलीय. असे असले तरी या दोन विषयांवर ठाम भूमिका घेतल्याशिवाय आंध्रच्या राजकारणात कोणत्याही पक्षाला पुढे जाता येत नाही याची जाणीव चिरंजीवीलाही नक्कीच असेल.


- हारिस शेख

Sunday, September 7, 2008

अमुचा खुदा तो जगन्निवास, पंढरी नगरी विराजे

खुदाच्या सोबतीनेच विठ्ठलालाही भजणारे अनेक मुस्लिम संतकवी महाराष्ट्रात होऊन गेले. पण आज आपल्यासमोर येणारा इतिहास त्याची नोंद करत नाही. ती नोंद केली असती तर वेगळा राष्ट्रवाद शिकवण्याची वेळ कथित राष्ट्रवाद्यांवर आली नसती.
....
विठुमाऊलीच्या नामाचा गजर करत लाखो भक्त आषाढीला पंढरपूर नगरीत पोचले आहेत. पंढरी जगरीत जणू विठुरायांच्या भक्तांचा अफाट मळाच फुललाय. अख्ख्या मराठी समाजाला भक्तीरसात डुंबवणा-या या सोहळ्यात जात धर्माच्या भींती ओलांडून अनेक मुस्लिमही सहभागी होत असतात. अनेक मुस्लिम वारकरी यात सहभागी होत असतात. मुस्लिमांच्या विठुप्रेमाचा इतिहास तसा फार प्राचीन आहे. महाराष्ट्राचा गेल्या पाचशे वर्षाचा इतिहास पाहिला तर अनेक मुस्लिम संतकवी पंढरीच्या विठोबाच्या भक्तीरसात न्हावून गेल्याचे आपल्याला दिसते. मिळे संतांची मंडळी, वाजे स्वानंदाची टाळी किर्तनघोषाची आरोळी, पळे पळे पाहोनी भीमरथी दक्षिणतीरीं, परब्रम्ह उभे विटेवरी कर ठेवोनि कटांवरी, ध्यान दिगंबर साजिरें. धर्माने मुसलमान आणि संप्रदायाने महानुभाव असूनही मराठी जनमानसावर आपल्या चरित्रचारित्र्याचा आणि वाणीचा प्रभाव गाजवणारा संतकवी शहा मुनी यांनी पंढरीच्या विठुरायाचे केलेले हे वर्णन.
महानुभावापंथीयांचे पंढरी आणि पांडुरंगाविषयी असलेली गौणत्वाची भावना सर्वज्ञात असताना देखील शहा मुनींच्या मनातला प्रेम ठायी ठायी स्पष्ट झालेलं आहे. कलयुगात पापे फार झाल्यामुळे प्रभूने पंढरीची पेठ वसविली आणि त्या पेठेत होळी पेटवून तीत दोषांच्या गोव-या जाळल्या. पंढरी हा पापसागराला ग्रासून टाकणारा अगस्तीच आहे. किंवा भवसर्पाला छिन्नभिन्न करून टाकणारा गरुडच आहे, या शहा मुनीने केलेली भोवोत्कट प्रेरणेनेच वारकरी २१ व्या शतकातही पंढरीची पायवाट धरतात. मराठी संतमंडळीत ‘ मृत्युंजय ’ या नावाने ओळले जाणारे शहा मुंतोजी ब्रम्हणी हे मोठे मुस्लिम संतकवी होऊन गेले आहे. बिदर (कर्नाटक) येथे राजविलास भोगत असताना मुंतोजीच्या आयुष्यात परिवर्तन घडविणारी एक घटना घडली आणि वैभवाचा त्याग करून ते अरण्याच्या दिशेने निघाले. वाटेत त्यांना पंढरपुराकडे जाणारी दिंडी भेटली. दिंडीबरोबर पंढरपुरात गेल्यावर तिथं टाळ, मृदंग वीणा यांच्या तालावर अनेक वारकरी गात-नाचत होते. या सगळ्यांकडे पाहून शहा मुंतोजी ब्रम्हणीचे चित्त वैराग्याकडे सहज आकर्षिले गेले. मुंतोजीला भक्तीची दीक्षा पांडुरंगाच्या चरणी मिळाली. पंढरपुरात आल्यानंतर कसे वाटले याचे वर्णन त्याने असे केले... ‘ बिजे भाजुनी लाह्या करणे, तैसे आम्हा येणे जाणे. आकारासी नाही ठाव, देही प्रत्यक्ष दिसे देव ’ .. मुंतोजी हा सूफी होता.हिंदू व मुसलमानी धर्मग्रंथातील तत्वे व विचार एकच आहेत, असे मुंतोजीने एका ग्रंथात लिहिले आहे. मुंतोजी यांनी ‘ स्वरूपसमाधान ’ , ‘ प्रकाशदीप ’ , ‘ सीताबोध ’ , ‘ पंचीकरण ’ सारखे अध्यात्मग्रंथही त्यांनी लिहिले आहेत. टाळ मृदुंगाच्या तालावर एकरूप झालेले वैष्णव पाहून मुंतोजीच्या भक्तीची ही उन्मत्त अवस्थेचे आकर्षण वाटु लागते.
पंढरपूरला मुंतोजीला ‘ विवेकसिंधू ’ चे पुस्तक प्राप्त झाले. सहजानंदांनी गुरूपदेश केल्यावरमुंतोजीचे मृत्युंजय असे नाव ठेवले. ‘ अमुचा खुदा तो जगन्निवास, पंढरी नगरी विराजे ’ असे शहा मुंतोजीने पंढरीच्या विठोबाचा एके ठिकाणी वर्णन केला केला आहे. विवेकसिंधूद्वारे गुरूशास्त्र आणि सहजानंदासारखा सद्गुरू मुंतोजीला विठ्ठलाच्या कृपेनेच लाभला, असे त्याची चरीत्रकथा सांगते. विठ्ठल हे भगवान श्रीकृष्णाचे बालरूप आहे, ही मराठी संतांची श्रद्धा मृत्युंजयानेही स्वीकारली.ज्याच्या मुखी वेणू आहे, जो पांडवांचा साह्यकारी आहे, जो द्रौपदीचा कैवारी आहे, तोच आनंदमय परमात्मा पंढरीत नांदत आहे, त्याचीच सेवा मृत्युंजय करीत आहे. अशी पंढरीच्या विठ्ठलाची स्तूती त्याने केली आहे.
मराठी संतांमध्ये ‘ कबिराचा अवतार ’ म्हणून ज्याची गणना केली जातो तो शेख महंमद हा एक प्रमुख मुस्लिम मराठी संतकवी होऊन गेला आहे. बीड जिल्ह्यात जन्मलेल्या या संतकवीचा कार्यकाळ इ.स. १५०० व्या शतकात होता. जनार्दनस्वामींचे गुरू दत्तावतारी चांद बोधले हे शेख महंमदाचेही गुरू होते. चांद बोधले हे सूफी साधू असल्यामुळे सूफी वेशात राहत होते. तेच चांद बोधले हे शेख महंमदांचेही गुरू होते हे उल्लेखनीय. शेख मोहम्मद हा कबिराच्या प्रकृतीचा असल्यामुळे त्याने तत्कालिन समाजात प्रचलित अंधश्रद्धांवर कोरडे ओढले. त्याचा राम हा कबिराप्रमाणेच व्यापक होता. राम नव्हे दाशरथी असे त्याने स्पष्ट शब्दात सांगितले होते. त्यामुळेच शेख महंमद हा देवदेवताच्या पसा-यावर कठोर हल्ला चढविताना दिसतो. पंढरी आणि पांडुरंग याविषयी त्याच्या हृद्यात भक्तिप्रेमाचा सागर हेलावताना दिसतो. शेख महंमदावर ज्ञानेश्वरीचा प्रभाव त्याच्या ग्रंथातील विचारांवर आणि अभिव्यक्तीवर झालेला दिसतो. त्यांची भाषा ही विविध संस्कारांनी भारलेली आहे.तिच्या घडणीत आणि लोकाभिमुख स्वरूपात लोकसंस्कार आणि संस्कार यांचा मोठा वाटा आहे. परंतु शब्दांच्या सागराहूनही अधिक खोली अनुभूतीमुळे प्राप्त होते यावर त्यांचा विश्वास होता. शेख महंमदाच्या या विवेकदृष्टीची त्यांना किंमतही द्यावी लागली. कर्मठ मुस्लिम मात्र शेख महंमदावर खप्पा असायचे, ते त्याला ‘ काफर ’ म्हणून हिणवायचे. खालील उदगारातून त्याने आपल्या अंत:करणातील खळबळ व्यक्त केली आहे बाभळेच्या झाडा, आंबे आले पाडा अपरोक्ष निवाडा, शेख महंमद यति मुसलमान, म-हाटी वचने ऐकती आवडीने, विप्र शूद्र इंद्रावळी वेलीं खरबुजें पिकली ते भावें सेविली, सदाचारी मुसलमान याती, निपजली मती अधिकारी होती, अठरा पगड सतराव्या शतकाच्या पूर्वार्धाला हुसेन अंबरखान हे संतकवी होऊन गेले आहे.
दौलताबाद येथे अधिकारपदावर काम करणा-या अंबरखान याच्या अधिकार क्षेत्रात सर्वधर्मियांना धार्मिक आचरणासाठी मुभा होती असे त्याच्या चरित्र्यावरून दिसून येते. गीतेवर टीका लिहिण्याचे धनुष्यबाण उचलणा-या या मुस्लिम कवीने अगदी सोप्या मराठीत, गीतेच्या सौंदर्याला अगदी बाधा न पोहचवता, ओविबद्ध टीका केली आहे. गीतेचा भावार्थ हुसेन अंबरखान यांनी सोपा करून दाखवला आहे. अंबरहुसेनी नावाच्या या ग्रंथात ८७१ ओव्या असून ही गीताटीका समश्र्लोकी स्वरूपात लिहिली आहे. येथे न लिहिणे अव्ययार्थ, आणि संपूर्ण पदांचा अर्थ विचारूनिया वाक्यार्थ, तात्पर्यार्थ लिहिजे हे झाले महत्त्वाचे मुस्लिम संतकवी. पण अलमखान, तुकारामशिष्य अनग़डशाह बाबा, रामदासी केशवस्वामींचे शिष्य वाजीद पठाण, शहाबेग आणि शकीरगंज, जंगली फकीर सय्यद हुसेन, शहा हुसेन फकीर, सय्यद महंमद, शेख सली महंमद, लतीफशाह, शहा दत्त अलमाप्रभू अशा अनेक संतांची कामगिरी मोलाची आहे.
गेल्या शेकडो वर्षात मुस्लिम संतांची ही कामगिरी महत्वाची मानली जाते. ज्ञानाच्या आसक्तीने सुरू झालेली ही परंपरा सध्याच्या काळात अधिक जोमाने पुढे नेण्याची गरज आहे. नव्हे हा कारवॉं वाढवणे ही काळाची गरज आहे.

साहित्य संमेलनाची ट्वेंटी-20

(हा लेख म्हणजे सॅन फ्रान्सिस्को येथे होणा-या साहित्य संमेलनाबाबतच्या वादांवर केलेले गंमतीशीर भाष्य आहे. तिरकस दृष्टिकोनातून मांडलेले हे संवाद प्रत्यक्षात मात्र झालेले नाहीत.)
...
सॅन फ्रान्सिस्कोला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आमच्या गावचं संमेलन पळवलं म्हणून ठाणे आणि रत्नागिरीकरांनी चॅनेलच्या कॅमेऱ्यापुढं जोरजोरात गळे काढणं सुरू केलं. साहित्य मंडळाचा निर्णय कसा चुकीचा आहे, हे राजकारण्यांपासून प्रकाशकांपर्यंत जो तो आपापल्या परीनं सांगत सुटला. मुंबई पुण्यातल्याच नाही तर तर अगदी यवतमाळपासून कणकवलीपर्यंतच्या सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये विरोधाचा कडक सूर उमटला. अगदी बाळसंही न धरलेल्या चॅनलने अख्खा प्राइम टाइम या विषयाला अर्पण केला. काय करावं आता या सर्वांचं? मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटलांना जाम टेन्शन आलं. आदल्या दिवशी मीडियाला मोठ्या डेरिंगनं सामोरे जाणारे कौतिकराव एवढा विरोध पाहून दुस-या दिवशी सकाळी थोडे नरमले. एवढा विरोध डावलून पुढं जायचं कसं? कारण सॅन फ्रान्सिस्कोतनं परतल्यावर पुढची संमेलनं तर इथल्या मातीवरच घ्यायची आहे ना!
मग, मार्ग कसा काय काढायचा यातनं? टेन्शनमध्ये आलेल्या कौतिकरावांनी औरंगाबादला मंडळाचे कार्यवाह के. एस. अतकरे यांना फोन लावला. अतकरे, 'मीच करणार होतो फोन तुम्हाला, बरं झालं तुम्हीच केला. अहो पाटील, पेपर बघितलेत का आजचे. सगळेच भडकलेले दिसतायत' ठाले पाटील, 'हो, काय करायचं मलापण कळत नाही. त्यासाठीच फोन केला तुम्हाला. मला वाटतं निर्णय बदलावा लागेल राव.' ' अहो पाटील, एवढा मोठा निर्णय घेतलाय की आता तुम्ही. आता बदलायचं म्हणता होय. एक काम करा. जरा सॅन होजेला फोन करून बे एरिया महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष संदीप देवकुळेंशी बोलून घ्या. सांगा तिकडे संमेलन घेणे शक्य नाही म्हणून.
' ' हॅलो, मिस्टर देवकुळे, ठाले पाटील हीअर, हाऊ आर यू ? ' फाइन, यू... थॅंक्स मिस्टर पाटील. इट्स हॅपिएस्ट मोमेंट फॉर अस. वी ऑल आर एन्जॉइंग द पार्टी हीअर, मिसिंग यू पीपल लॉट !!! चिअर्स !!! देवकुळे मला काही महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. कर्कश्श म्युझिक सुरू आहे तुमच्या तिकडे. आवाज नीट ऐकू येत नाही. जरा बाहेर येऊन बोला की.' ' ओके ओके... बोला बोला... आता बोला...' देवकुळे पाटील, 'मिस्टर देवकुळे, ऐका. सॅन फ्रान्सिस्कोला संमेलन घेण्याला खूप विरोध होतोय इकडे. विंदांपासून महानोरांपर्यंत , प्रकाशक, पत्रकार सगळेच सडकून टिका करतायत. सॉरी टू से, की वी आर रिथिंकिंग अबाउट द व्हेन्यू ऑफ संमेलन. नाऊ इट वील नॉट हेल्ड अॅट सॅन फ्रांसिस्को.' ' मिस्टर पाटील, व्हॉट आर यू टॉकिंग? काय बोलताय तुम्ही. महिनाभरापूर्वी तुम्हीच बोलला होता की अनाउन्समेंट ही फॉर्मलिटी असेल, तुम्ही तयारीला लागा. सगळी तयारी झालीय आमची. फंड बींड, तिकिट्स बुक करणं, व्हेन्यु वगैरे वगैरे... तुमच्यावर होणारी टिका आम्हीही वाचलीय आहे, नेटवर. टिका काय होतच राहणार. तुम्ही एक काम करा. अशा क्रायसिसमधून मार्ग कसा काढायचा हे जरा तुमचे मित्र शरद पवार यांना विचारा. काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. त्यानंतर आपण बोलू. ओके. बाय बाय...'
सेकंदभराचा वेळही न दवडता कौतिकरावांनी पवार साहेबांना फोन लावला, ' नमस्कार साहेब मी कौतिक बोलतोय. साहेब एक अडचण झालीय. हल्ली तुम्ही मराठी कमी वाचता म्हणून कदाचित माहित नसेल तुम्हाला. पुढचं साहित्य संमेलन आम्ही सॅन फ्रान्सिस्कोत घ्यायचं ठरवलंय. पण साहेब लय भारी विरोध आहे. काय करायचं कळत नाय.' पवार, 'काय करायचं म्हणजे काय. आमच्या ट्वेंटी २० ला नाही का विरोध झाला होता. पण आम्ही विरोधाकडे पाठ करत गेलो ना पुढे. आज बघा आमच्यामागे दुनिया आहे. बघा तुम्ही, असं काही होऊ शकतं का? नेहमीचं त्या रटाळ संमेलनाचं इव्हेंटमध्ये परिवर्तन कसं होईल ते बघा. मनी अर्निंग बनवा.' पवारांच्या सल्ल्याने कौतिकरावांच्या अंगात बळ आलं. अतकरेंना त्यांनी पुन्हा फोन केला. 'बघा अतकरे, प्रॉब्लेम सॉल्व झाला. यावर्षापासून आम्हाला ट्वेंटी२० क्रिकेट सामन्यांसारखं दोन साहित्य संमेलनं आयोजित करावी लागणार आहेत. क्रिकेटमध्ये जो बीसीसीआयचा रोल असतो तो संमेलनाच्या आयोजनात आमचा म्हणजे साहित्य महामंडळाचा असेल. ५० ओवरच्या वन डेप्रमाण नेहमीप्रमाणे अखिल भारतीय संमेलन भरतच राहणार. पण त्याचवेळी आयपीएलप्रमाणे आणखी एक साहित्य संमेलन परदेशातही होईल. तेही दरवर्षी. त्याचं स्वरूप थोडंस वेगळं असेल.' अतकरे - 'पण, असं कसं म्हणताय साहेब. क्रिकेट आणि साहित्य यात जमीन अस्मानचं अंतर आहे की. खेळाडू आणि साहित्यिकांना एकाच मापदंडात कस काय मोजताय तुम्ही.? '
अहो थांबा अतकरे' कौतिकराव गरजले, 'माझं बोलण तर पूर्ण होऊ द्या जरा.' ' परदेशात भरणा-या संमेलनात साहित्यिकांसाठी सर्वप्रथम आयपीएलप्रमाणे बोली लावली जाईल. कोणत्या साहित्यिकावर बोली लावायची आणि कोणत्या नाही हे महामंडळ ठरवेल. शिवाय यात काही क्लॉजेसही टाकणार आहोत आपण.' ' क्लॉज, आता ते कशाला?- अतकरे ' अहो, आयपीएलमध्ये नव्हते का क्लॉज. उदाहरणार्थ आयकॉन खेळाडूंना इतरांपेक्षा १५ टक्क्यांनी जास्त पैसे मिळणार, रणजी स्तरावरच्या खेळाडूंना घेणे बंधनकारक, शिवाय विरोधी आयसीएल लीगमध्ये गेलेल्यांना प्रवेशबंदी. आपल्यालाही तसंच करायचंय,हा' कपाळावरचा घाम पुसत, आणि जोराचा सुस्कारा टाकत अतकरे म्हणाले, 'ते कसे' ' बोलीमध्ये सहभागी होणारे पन्नास टक्के साहित्यिक पुण्या-मुंबईतले घेऊ. त्यानंतर मग ग्रामीण, दलित, महिला, मु्स्लिम, जैन, विदर्भ, अहिराणी, कोंकण अशा साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांसह प्रत्येकी पाच साहित्यिकांना विकत घेणे बंधनकारक ठेवू.' ' पण साहेब, आयपीएलने आयसीएलमधल्या खेळाडूंवर बंदी टाकली होती. आता आपण कोणत्या साहित्यिकांवर बंदी टाकणार आहोत?' ' हा काय प्रश्न झाला. विदोही साहित्य संमेलनात सहभागी होणा-यांना आपले दरवाजे बंद. बंद म्हणजे बंदच' ' पण, साहेब, आयकॉन साहित्यिक कोण असणार आपले?'- अतकरे ' अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे सर्व माजी अध्यक्ष हे आपले आयकॉन साहित्यिक असतील. त्यांची किंमत इतरांपेक्षा १५ टक्के जास्तच असणार. आणि हो, भारतातल्या संमेलनासारखं हे संमेलन चॅनलवाल्यांना फुकट प्रदशिर्त करता येणार नाहीय याचेही मीडिया राइट विकले जातील.' तिकडे वर्तमानपत्रांच्या कार्यालयात परदेशात होणा-या या संमेलनाला झोडणारे लेख तयार करणे सुरू होते, याच विषयावर संध्याकाळच्या शोसाठी चॅनलवाले गेस्टच्या शोधात होते.
दरम्यान सगळा प्लॅन झाल्यावर ठाले पाटलांनी सॅन होजेला फोन केला. ' हॅलो, मिस्टर देवकुळे. संमेलन होणार ते सॅन फ्रान्सिस्कोलाच. डन. तेही नव्या ढंगात. नव्या रंगात. एकदम फ्रेश प्लॅन. मेलनी पाठवतो तुम्हाला. सध्या तुम्ही पार्टी एन्जॉय करा. सकाळी उठल्यावर वाचा. म्हणजे समजेल तुम्हाला ते.
बाय बाय !

नोबेलच्या तोडीचा साहित्यिक

ज्येष्ठ साहित्यिक बाबूराव बागूल यांच्या निधनाने मराठी साहित्यातला हिरा निखळला. समाजातल्या दुर्लक्षित, शोषित, पिडितांच्या भावभावनांचं आपल्या कथा कादंब-यांमधून जिवंत चित्रण त्यांच्या साहित्यात आहे. हे साहित्य इंग्रजीत अनुवादित झालं असतं, तर त्याला साहित्याचं नोबेल नक्कीच मिळालं असतं. जागतिक दर्जाचं असं हे लिखाण आहे. १९६० च्या दशकात मराठी साहित्यात दलित साहित्याचा प्रवास सुरू झाला. त्या प्रवाहाच्या जडणघडणीत बाबूरावांची भूमिका फार मोलाची आहे. बाबूरावांच्या साहित्यावर मार्क्सवादाचा प्रभाव होता. त्यांनी लिहिलेल्या कथा, कादंब-या, वैचारिक लिखाण हे तर फार उच्च दर्जाचे होते. ‘जेव्हा मी जात चोरली,’ ‘मरण स्वस्त होत आहे,’ हे कथासंग्रह तर सगळ्या मराठी साहित्याचे मापदंड ठरावे असेच आहे. त्यांनी लिहिलेली ‘कोंडी’ ‘आंबेडकर भारत १ आणि २’ हे जातककथांच्या रूपात मांडलेले बाबासाहेबांचे चरित्र तसेच ‘वेदा आधी तू होतास’ हा कवितासंग्रह तर माझ्या विशेष आवडीचा आहे. बाबूरावांच्या लेखनात एक समान सूत्र होतं. समाजातले दुर्लक्षित, शोषित, पिडित आणि सर्वसामान्य जनतेच्या भावभावनांचे जिवंत चित्रण बाबूराव बागुलांनी आपल्या साहित्यातून केले आहे. बाबूराव बागूल यांच्या कथा कादंब-या या मराठी साहित्याच्या मापदंड होत्या, असं माझे मत आहे.
सर्वसामान्यपणे मराठी साहित्याच्या तुलनेत बागुलांच्या साहित्याचा दर्जा फारच वरचा होता. निर्विवाद नोबेल पुरस्कार मिळवण्याचा हा दर्जा होता. बाबूरावांचे साहित्य इंग्रजीत अनुवादित झाले असते तर साहित्याचा नोबेल नक्कीच मिळालं असतं. पण इथे त्याची दखल हवी तशी घेतली गेली नाही. पुणे विद्यापीठाने आपल्या परीने त्यांना सलाम केला होता. १० फेब्रुवारीला आम्ही त्यांना जीवनसाधना पुरस्कार त्यांच्या घरी जाऊन दिला होता. तो माझ्यासाठी मोठ्या समाधानाचा क्षण होता. व्यक्तिगत पातळीवर माझा बाबूरावांशी अनेक वर्षापासूनचा परिचय होता. त्यांच्यासोबत झालेल्या प्रत्येक भेटीतून नवीन शिकता आलं. तीन महिन्यांपूर्वीच मी आणि अर्जुन डांगळे त्यांना भेटायला नाशिकला गेलो होतो. त्यांची तब्बेत बरीच खालावली होती. तरीही त्यांनी मला ओळखलं. माझा हात हातात घेऊन हळूच दाबला, बोलता येत नव्हतं तरी त्यांनी भावना कळवल्या. बाबूराव बागूल गेल्याने व्यक्तिगत पातळीवर माझं फार मोठं नुकसान झालं आहे.
(डॉ. नरेंद्र जाधव)

महाराष्ट्र अब्जाधीशांचा आणि आत्महत्यांचाही

जिथं कर्जबाजारीपणामुळे दर आठ तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय, त्याच राज्यात तब्बल २९ अब्जाधीश राहतात. हे परस्परविरोधी चित्र दुस-या कुठल्या राज्यातले नसून आपल्याच, महाराष्ट्रातले आहे.
...

फोर्ब्स मासिकाने नुकत्याच केलेल्या पाहणीत देशभरातील एकूण अब्जाधीशांपैकी २९ अब्जाधीश एकट्या महाराष्ट्रात राहत असल्याचं नमूद केलंय. भारतातल्या एकूण अब्जाधीशांजवळ असलेल्या संपत्तीत गेल्या एका वर्षात दुप्पटीनं वाढ झाल्याचेही या पाहणीत आढळलं. या पाहणीनुसार गेल्या वर्षी भारतात चाळीस अब्जाधीशांजवळ मिळून १७० अब्ज डॉलर एवढी संपत्ती होती. त्यात यावर्षी दुप्पट वाढ होऊन ती ३५१ अब्ज डॉलर एवढी झालीय. अबब... केवढी ही आकडेमोड आणि केवढी ही श्रीमंती.. आणि यातले अर्ध्याहून अधिक पैसा महाराष्ट्रात आहे. आपण ख-याखु-या आकड्यांविषयी बोलतोय की काही काल्पनिक गप्पा चालल्यात असा विचार करण्याची पाळी यावी असे हे भीषण वास्तव !
मराठमोळ्या महाराष्ट्रात एवढी श्रीमंत माणसे खरोखरच राहतात, यावर क्षणभर विश्वास बसणार नाही. पण जगभरातल्या धनिकांच्या प्रिय फोर्ब्स मासिकाची ताजी यादी हे वास्तव असल्याचे आपल्याला सांगते आहे. अब्जाधिशांच्या संख्येत दरवर्षी होणारी वाढ ही भारतीय अर्थव्यवस्थेच्या जलदगतीने होत असलेल्या वाढीचेही द्योतक मानले जाते. मुंबई आणि पुणे या महाराष्ट्राच्या दोन शहरांमध्ये २९ अब्जाधीश व्यक्ती राहतात, असे फोर्ब्जच्या ताज्या यादीत सांगीतलेय. राज्याच्या दृष्टीने ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. दुष्काळ आणि कर्जबाजारीपणामुळे ज्या राज्यात दर आठ तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय, त्या राज्यात अब्जाधीशांच्या संख्येत आणि संपत्तीत अफाट वाढ होत आहे. आणि हे परस्परविरोधी चित्र दुस-या कुठल्या उत्तरेतल्या राज्यातले नसून आपल्याच, महाराष्ट्राचे आहे. अशा परिस्थितीत राज्यात नेमका विकास कुणाचा आणि फायदा कुणाचा होतोय, हा प्रश्नच आहे. फोर्ब्स मासिकाच्या यादीत श्रीमंत भारतीयांची संख्या वाढत असताना इथल्या गरिबांच्या संख्येतही झापाट्यानं वाढ होऊन अत्यंत वाईट अवस्थेत जगत असल्याचं जळजळीत वास्तवाकडे डोळेझाक करता येणार नाही.
शेअर मार्केटमधली तेजी आणि अर्थव्यवस्थेमध्ये आलेला बूम बघून अनेकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या, मात्र इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूटने नुकत्याच जाहीर केलेल्या केलेल्या ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये भारत २४ व्या क्रमांकावर आहे. अगदी आफ्रिकेतल्या इथियोपीया पेक्षाही भारतात गरींबांची वाईट दशा असून दिवसेंदिवस इथे भूकेल्यांची संख्या वाढत चालली असल्याचं या आकडेवारीतून दिसून आले आहे. महाराष्ट्राची विभागणी आता सरळ सरळ दोन बेटांमध्ये करावी लागणार आहे. एक अब्जाधीशांचे तर दुसरे गरीब, कर्जबाजारी आणि उपासमारी सहन करणा-यांचे. भौगोलिक दृष्ट्या दोन्हीं दरम्यान अंतर तसे फार नाही. मात्र आर्थिक दरी प्रचंड. ‘ ह्यांना ’ त्यांचे सोयरसुतक नाही. ‘ त्यांना ’ यांच्या जगाची माहिती नाही. सरकारी आकडेवारी नुसार दुष्काळ, प्रचंड गरीबी आणि कर्जबाजारीला कंटाळून गेल्या दहा वर्षात विदर्भात पन्नास हजार शेतक-यांनी आत्महत्या केलीय.
राज्याचे कृषी धोरण फसल्यानंतर सध्या इथल्या शेतक-यांची अवस्था अत्यंत वाईट अशी आहे. सततचा दुष्काळ, डोक्यावर वाढते कर्ज आणि भ्रष्टाचार यामुळे अनेकांना खेडी सोडण्याला पर्याय उरलेला नाही. श्रीमंत आणि गरीबांमध्ये एवढी प्रचंड दरी वाढलेली असताना आर्थिक वाढीचा वेग खरेच योग्य दिशेने जातोय का, हा खरा प्रश्न आहे. महाराष्ट्रात आणि एकूणच देशात एवढ्या जलदगतीने श्रीमंती वाढत असेल तर निश्चितच गरीबांसाठी जीवघेणी अशी वाढ म्हणावी लागेल. समाजातली असमानतेत सतत वाढ होत चालल्याचं दिसते. इमारतीचा पाया ठिसूळ ठेऊन उंचच्या उंच टॉवर बांधण्याचा हा प्रकार वाटतो.

इतिहास कामाठापु-यातल्या गुप्तरोग क्लिनिकचा

ब्रिटिश सैनिकांसाठी उभं राहिलेलं भारतातलं सर्वात जुनं गुप्तरोग क्लिनिक कामाठीपु-यात उभं आहे. त्याची ही मुलखावेगळी कहाणी.
...

मुंबई सेंट्रल स्टेशनवरून वरून बेलासिस रोडने नागपाड्याकडे जात असताना रस्त्याच्या डाव्या बाजुला एक जुनी , जीर्ण इमारत दिसते. समोर जुनं अलेक्झांड्रिया थिएटर आणि आणखी एक पाऊल पुढे गेलो की महाराष्ट्र कॉलेजची उंच इमारत अशा एकासमोर एक इमारती ओळीने दिसतात. सिग्नलच्या अगदी अलीकडेच रस्त्याच्या कडेला मोठ्या झाडांच्या फांद्यामधून या इमारतीवर नजर टाकली तर ‘ लैंगिक संसर्गजन्य (गुप्त) रोग चिकित्सालय ’ लिहिलेली एक धुळाने माखलेली पाटी लटकलेली दिसते. नव्वद वर्ष जुनं असलेलं देशातलं हेच ते पहिलं वहिलं एसटीडी अर्थात सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेसवर उपचार करणारं क्लिनिक. बेलासिस रोडला लागून असलेल्या या क्लिनिकच्या शंभर मीटर अंतरावरून सुरू होते ती मुंबईतली एकाकाळची सर्वात मोठी वेश्यावस्ती , कामाठीपूरा. मुंबईचा रेडलाइट एरिया. इंग्रज राजवटीच्या काळात ब्रिटिश सैन्यातले सैनिकांचं आवडतं लाल बझार. कामाठीपु-यात कामभावनेच्या तृप्तीसोबत अनेक दुर्धर लैंगिक रोगांना कवटाळलेल्या असंख्य रुग्णांना गेली नव्वद वर्ष जीवदान ठरलेलं हे क्लिनिक आज मोडकळीस आलेलं आहे. मुंबई महापालिकेच्या इतर दुर्लक्षित विभागासारखे हे क्लिनिकही आपला सोनेरी इतिहास पोटात दडवून प्रचंड वर्दळीच्या बेलासीस रस्त्याच्या बाजुचा टक लावून बदलत्या इतिहासाचा साक्षीदार होण्यास जणू एक टक बघतोय.
१९१६ साली सुरू झालेल्या या ‘ लैंगिक संसर्गजन्य (गुप्त)रोग चिकित्सालया ’ च्या स्थापनेमागची कहानी मजेदार आहे. अठराव्या शतकात ब्रिटिश सत्तेच्या काळात मुंबई हे देशातल्या राजकीय , आर्थिक आणि दळणवळणाचे मुख्य केंद्र होते. ब्रिटिश सैन्याच्या वसाहती या ठिकाणी होत्या. ब्रिटनला जाण्यासाठी मुंबईमार्गे जहाजाने जाण्याची सोय होती. देशभरातून आलेले सैनिक ब्रिटनला जाणा-या जहाजाची वाट पाहत महिनोंनमहीने मुंबई बंदरावर थांबत असत. शिवाय ब्रिटिश सैन्याची मुंबईत वसाहत होतीच. ब्रिटिश काळात वेश्याव्यवसायाला कायदेशीर मान्यता नसली तरी सैन्यातल्या गो-या सैनिकांच्या मनोरंजन व्हावे या उद्येशानं देशभरातल्या लष्करी वसाहतींजवळ एक टॉलरेटेड एरिया असायचा. चेन्नई , कोलकता आणि अवध या तेव्हाच्या ब्रिटिश लष्करी वसाहतींजवळ अशाच प्रकारचे टॉलरेटेड एरिया अस्तित्वात आल्याचं दिसतं. लाल वर्दीधारी ब्रिटिश सैन्य या परिसरात मनोरंजनासाठी येत असल्यामुळं स्थानिक लोक हा परिसर लाल बझार नावाने ओळखायचे. मुंबईत अशा प्रकारचा टॉलरेटेड एरिया (लाल बझार) कामाठीपु-यात अस्तित्वात आला. ब्रिटिशांनी वसवलेल्या या लाल बझार मध्ये लष्करी जवानांचा प्रचंड राबता राहत असे.
साहजिकच ब्रिटिश सैनिकांमध्ये अनेक प्रकारचे लैंगिक संसर्गजन्य रोगांची लागण होत. ब्रिटिश राजवटीत सैनिकांना वेश्यागमनासाठी जणू छुपा पाठिंबा होता. परिणामी ब्रिटिश सैनिकांची लाल बझारची वारी अखंड सुरू होती. परिणामी ब्रिटिश सैनिकांमध्ये लैंगिक संसर्गजन्य गुप्तरोग वाढीला लागले. लष्करात अशा प्रकारच्या रोगांनी पछाडलेल्यांची संख्या सतत वाढत चालली होती. एका तत्कालीन पाहणीनुसार केवळ लैंगिक संसर्गजन्य गुप्तरोगांमुळे जगभरातल्या ब्रिटिश वसाहतींमध्ये दरवर्षी तीन रेजिंमेंट्स एवढे सैन्य मृत्यूमुखी पडत होते. मात्र नाविक दलात अशा रोगांनी बळी पडणा-यांची सेलर्सची संख्या होती रोजची ३८६. एकूणच अठराव्या शतकाच्या मध्यात ब्रिटिश लष्कराचं आरोग्य लैंगिक रोगांमुळे ब-यापैकी धोक्यात आले होते. आपल्या लष्करावर आलेल्या या संकटामुळं ब्रिटिश सरकारची झोप उडवली होती. या रोगांवर आळा घालण्यासाठी उपाययोजना शोधून नेमकं किती सैन्य बाधित झालंय , याचा तपास करण्यासाठी १८६४ साली सॅनिटरी कमिशनची स्थापना करण्यात आली. या कमिशनने सादर केलेला दिलेला अहवाल मात्र धक्कादायक असा होता. कमिशन म्हणते , One third of the army was affected and number in some stations being 50, 60 and 70 percent of the total .’ परिस्थिती हाताबाहेर जात होती. सैन्याला लैंगिक संसर्गजन्य रोगांपासून वाचवण्यासाठी तातडीचे ठोस उपाय करण्याची गरज ब्रिटिशांना भासली. आत्ताच काही कडक उपाय योजले गेले नाही तर लष्कराचं काही खरं नाही हे लष्करी अधिका-यांच्या लक्षात आलं होतं. याचा परिणाम म्हणजे १८६८ सालचा दि इंडियन काँटायजिअस डिसिज अॅक्ट अस्तित्वात आला. ब्रिटिश आर्मीतील लैंगिक संसर्गजन्य गुप्तरोगाचा मुकाबला करण्यासाठी कायद्यात जाचक अटी टाकण्यात आल्या. या कायद्याद्वारे भारतातल्या सर्व लष्करी वसाहतींच्या परिसरातली वेश्यालये आणि त्यातल्या वेश्या यांची सरकार दरबारी नोद बंधनकारक करण्यात आली. शिवाय या वेश्यांची वैद्यकीय तपासणी आणि तपासणीदरम्यान गुप्तरोग आढळल्यास वेश्यांना उपचार घेणे बंधनकारक करण्यात आले. साहजिकच या कायद्यामुळे वेश्यालयांमध्ये प्रचंड खळबळ माजली. तपासणी टाळण्यासाठी अनेक वेश्या लांब निघून गेल्या. वैद्यकीय तपासणी केवळ वेश्यांना बंधनकारक केल्यामुळं या कायद्याला स्थानिक पुढारी तसेच ब्रिटिश बुध्दीवंतांकडून विरोधास सामोरे जावे लागले.

तत्कालिन बॉंबे म्युन्सिपाल्टीचे प्रमुख असलेले विश्वनाथ नारायण मंडलीक यांनी त्यांच्या न्यायसिंधू या पत्रात लिहिले की हा कायदा वेश्यांवर अन्याय करणारा असून वेश्यांसोबत त्यांच्या ग्राहकांचीही तपासणी बंधनकारक केली गेली पाहिजे. ब्रिटिश सैन्यात फोफावलेला लैंगिक संसर्गजन्य रोग आटोक्यात आणण्यासाठी कॅन्टॉन्मेंट अॅक्ट मधील अनेक जाचक तरतुदी होत्या. त्यापैकी आणखी एक जाचक तरतूद म्हणजे लॉक हॉस्पिटलची स्थापना करणे. वैद्यकीय तपासणी दरम्यान एखादी वेश्या लैंगिक संसर्गजन्य रोगाने ग्रस्त आढळली तर तिला उपचारासाठी किमान तीन महिने रूग्णालयात डांबून ठेवलं जायचं. मुंबईसह कोलकता , चेन्नई , पुणे , सातारा या शहरांमध्ये अशा प्रकारची लॉक हॉस्पिटल उघडण्यात आली होती. मुंबईत अशा प्रकारचं एक लॉक हॉस्पिटल माझगावला एस्प्लेनेड नावाच्या हॉटेलजवळ अशा प्रकारचे लॉक हॉस्पिटल उघडण्यात आलं होतं. कॅन्टॉन्मेंट कायद्यानुसार झालेल्या नोदीनुसार १८७० मध्ये मुंबई शहरात २००३ वेश्यांची नोंद केली गेली होती. वैद्यकीय तपासणीअंती त्यातल्या ६६० वेश्यांमध्ये विविध प्रकारचे लैंगिक संसर्गजन्य गुप्तरोग आढळले होते. सरकारला प्रत्येक वेश्येची तपासणी आणि उपचार यावर २७ रूपये आठाणे खर्च येत होता. त्यामुळं सरकारने महसुलातून आलेल्या पैशातून हा खर्च करू नये असं काहींचं म्हणण होतं. त्यामुळेही हा विषय वादाचा झाला होता. सरकारने एवढे कायदे करूनही लष्करात फोफावलेल्या लैंगिक संसर्गजन्य गुप्तरोगांना फारसा काही आळा बसला नव्हता.

भारतात ठिकठिकाणी होणारा विरोध पाहता १८७० साली ब्रिटिश अधिका-यांनी थोडे नमते घेतले. आणि या कायद्यान्वये बंधनकारक केलेल्या गोष्टी ऐच्छिक करण्यात आल्या. शेवटी १८७२ साली दि इंडियन काँट्याजिअस डिसिज अॅक्ट रद्द करण्यात आला. लैंगिक संसर्गजन्य रोगाचा फैलाव आणि लष्कराची आरोग्य याविषयाचा अभ्यास करण्यासाठी पुन्हा १८९० साली रॉयल कमिशन ऑन हेल्थ ऑफ द आर्मीची स्थापना करण्यात आली. या कमिशनने १९१० साली आपला अहवाल सादर केला. त्यात लष्करी जवानांच्या लैंगिक उपचारांसाठी एखादे चिकित्सालय स्थापन करावे , अशी शिफारस करण्यात आली होती. मुंबईत अशाप्रकारचं क्लिनिक स्थापन करण्यामागे आणखी एक प्रमुख कारण होते. मुंबई बंदरावर मुक्काम करून मायदेशी परत जाणा-या ब्रिटिश सैनिकाला जहाजावर चढण्यापूर्वी कोणताही लैंगिक संसर्गजन्य रोग नसल्याचे मेडिकल सर्टिफिकेट सोबत घेणे बंधनकारक होते. त्यासाठी अशा प्रकारची खात्रीशीर तपासणी करून प्रमाणपत्र देणा-या संस्थेची मुंबईत नितांत आवश्यकता होती. शिवाय मुंबईत लैंगिक गुप्तरोग चिकित्सालय असावे , अशी शिफारस आधीच रॉयल कमिशनने केली होती. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर ‘ लिगसी फॉर कॉम्बॅटिंग व्हिनरल डिसिजेस ’ ही सामाजिक संस्था पुढे आली. आणि १९१६ साली बेलासिस रोडवर एका छोट्या जागेवर त्याकाळचं व्हिनरल डिसिज (व्हीडी) क्लिनिक अर्थात गुप्तरोग दवाखान्याची स्थापना करण्यात आली. क्लिनिकच्या स्थापनेनंतर नऊ वर्षानी म्हणजे १९२५ साली तत्कालिन बॉम्बे मुन्सिपाल्टीने हे क्लिनिक चालवायला घेतले. लैंगिक गुप्तरोगांविषयी प्रचंड अज्ञान असलेल्या तत्कालिन समाजात अशा प्रकारचे हॉस्पिटल सुरू झाल्यानंतर त्याबद्दलची प्रचंड उत्सूकता असणं स्वाभाविकच होतं. वैद्यकीय सुविधांचा अभाव असलेल्या त्या काळात लैगिक गुप्तरोग बरे करण्यासाठी अघोरी उपाय केले जायचे. मुख्यत : वैद्य , हकीम , बाबा , महाराज , पीर- फकीर यांच्याकडून हे उपचार करून घेतले जायचे.
मात्र या क्लिनिकच्या स्थापनेमुळं परिसरातल्या अनेकांना दुर्धर त्रासापासून मुक्ती मिळाली. ब्रिटिश आर्मीतील जवानांसाठी तर हे क्लिनिक जणू वरदानच ठरलं होतं. लैंगिक गुप्तरोगाविषयी तक्रार घेवून आलेल्या गो-या साहेबांच्या वैद्यकीय तपासण्या , त्यावरचा औषधोपचार असे प्राथमिक कार्य सुरूवातीला इथं चालायचं. नंतर हळूहळू मात्र या क्लिनिकची ख्याती शहरात दूरवर पसरत गेली आणि लोकांचा राबता वाढला. मुंबईच्या वस्त्यांमध्ये या क्लिनिकची माऊथ पब्लिसिटी होऊ लागली. त्यानंतर मात्र कामाठीपु-यात वेश्यागमनासाठी नेहमी येणारे ग्राहक आपल्या तक्रारी घेवून इकडे येवू लागले. सुरुवातीला लाजत , बुजत , आपल्याला कुणी पाहत तर नाही ना , याची खबरदारी घेत माणसं इकडे येत. काही पांढरपेशे लोक पण या क्लिनिकमध्ये येत. क्लिनिकची लोकप्रियता वाढू लागली. १९६० च्या दशकात या क्लिनिकला रोज भेट देणा-यांची संख्या दीड हजारावर होती. क्लिनिकचं स्वरूप जनरल असल्यामुळं सुरूवातीला पुरूषांचाच जास्त भरणा असायचा. लैंगिक संसर्गजन्य प्रसाराचं स्त्रोत वेश्या असायच्या. मात्र त्यांनाच इथं उपचाराला वाव नसायचा. लैंगिक गुप्तरोगासारख्या विषयाबद्दल समाजात भयंकर टॅब्यू असतानाही इथं येणारी लोक मोठ्या विश्वासाने आपल्याबद्दलची माहिती डॉक्टरांसोबत शेअऱ करत. यामागे आणखी एक कारण म्हणजे रूग्ण आणि त्याच्या गुप्तरोगांविषयी इथं बाळगली जात असलेली गुप्तता. इतर सरकारी रूग्णालयांसारखं या क्लिनिकमध्ये उपचारासाठी येणा-या रूग्णाचं नाव कुठल्याही पेपरवर लिहिलं जात नाही. अगदी केसपेपरवरसुध्दा रूग्णाचे नावाचा रकाना नसतो. केवळ रुग्ण क्रमांकानुसार त्याच्यावर उपचार केला जातो. त्यामुळं रूग्णाची सगळी हिस्ट्री डॉक्टरांव्यतिरिक्त इतरांना कळण्याचा प्रश्नच नाही.

वसाहतवाद संपुष्टात आल्यानंतर १९४७ साली ब्रिटिश गेले. मात्र कामाठीपुरा आपले पाय घट्ट रोवून इथेच उभा राहिला. दरम्यान मुंबईची वाढ होऊ लागली. गिरण्या , उद्योगधंदांच्या वाढीमुळं मध्यमुंबईत कामगारवर्गाची वाढ झाली. साहजिकच लोकसंख्यावाढीमुळं कामाठीपु-यात येणा-यांच्या संख्येतहा वाढ झाली. पुढे अँटिबायोटिक्स औषधं मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यावर छोट्यामोठ्या गुप्तरोगांना ब-यापैकी आळा बसला. त्यामुळे हे क्लिनिक शहरातल्या गि-हायकांसाठी समस्या निराकरणासाठी हक्काचं ठिकाणं झाले. या क्लिनिकचा फायदा हजारो लोक घेत असताना लैंगिक गुप्तरोगांचे उगमस्थान असणा-या कामाठीपु-यातल्या वेश्यांसाठी मात्र हाकेच्या अंतरावर असलेल्या या एसटीडी क्लिनिक पर्यंत पोहोचणं अशक्यप्राय असेच होते. त्याला दोन कारणे होती. महापालिकेचं सर्वसाधारण रूग्णालय असल्यामुळं गुप्तरोगी पुरूष रूग्णांचा इथे जास्त भरणा असायचा. अशा वातावरणात एखादी वेश्या गुप्तरोगाचा उपचार करण्यासाठी क्लिनिकमध्ये ग्राहकाला दिसली तर व्यवसायावर परिणाम तर होणार नाहीना , याची सतत भीती तिच्या मनात दडलेली असायची. दुसरे एक कारण म्हणजे वेश्यांवर त्यांच्या मालक - मालकीणींचा असलेला अविश्वास. देशाच्या वेगवेगळ्या भागातून हजारो रूपये देऊन खरेदी करून या वेश्यालयांमध्ये आणलेलं असतं. त्यांना दिवसदिवसभर पिंज-यासमोर उभे ठेवून , रात्रंदिवस त्यांच्याकडून हा व्यवसाय करवून घेत असत. इथल्या सगळ्यांनाच अशा या नरकातून पळून जावंस वाटतं. मात्र रात्रंदिवस वेश्यांवर पाळत ठेवून तोही मार्ग बंद केलेला असतो. अशावेळी लैंगिक उपचाराचं कारण दाखवून एखादी वेश्या रस्त्यापल्याडच्या त्या क्लिनिक मधून पळून गेली तर मालकाचे झालेले आर्थिक नुकसान कोण भरून देणार.
वेश्यांना याचा लाभ घेता यावा म्हणून एसटीडी क्लिनिक मधल्या डॉक्टरांनी शक्कल लढवली. काही स्थानिक कार्यकर्ते , व्यवसाय सोडून मुख्यधारेत आलेल्या माजी वेश्या तसेच काही कम्युनिटी हेल्थ वर्करना सोबत घेवून वेश्यांना क्लिनिकमध्ये आणलं जायचं. हे मोठ जिकीरीचं काम होतं. मात्र लैंगिक संसर्गजन्य गुप्तरोगाचं स्त्रोत थांबवण्यासाठी ही जोखीम घेणं आवश्यक होतं. पुढे खास महिलांसाठी वेगळं एसटीडी क्लिनिकची गरज लक्षात घेवून महापालिकेने १९९२ साली वेगळं क्लिनिक स्थापन केलं. कामाठीपु-यातल्या तेराव्या गल्लीत असलेल्या महापालिकेचं जुनं गौरीमा क्लिनिकचं रूपांतर महिलांसाठी गुप्तरोग क्लिनिकमध्ये करण्यात आलं. २००३ साली क्लिनिकच्या पहिल्या मजल्यावर मांडण्यात आलेलं लैंगिक शिक्षणावर आधारित ‘ अंतरंग ’ हे अनोखं प्रदर्शन या एसटीडी क्लिनिकच्या इतिहासातला महत्वाचा टप्पा मानला जातो. मानवी शरीराची रचना , लैंगिक अवयव , त्यांची कार्ये , मानवी शरीरात घडणा-या प्रक्रिया हे सगळं स्त्री- पुरूषांच्या नग्न पुतळ्यांद्वारे प्रदर्शनात समजावून सांगण्यात आलं होतं. मॉड्युल्सद्वारे सेक्स एज्युकेशनची ही कल्पना शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाली होती. सुरक्षित लैंगिक संबंधाबाबत माहिती देणारं हे प्रदर्शन कामाठीपु-यातल्या वेश्या आणि तिथं येणा-या ग्राहकांमध्येही लोकप्रिय ठरलं होतं. २००३ मध्ये वाजत गाजत सुरू झालेलं हे प्रदर्शन नेमकं २००७ च्या जून महिन्यात गुंडाळण्यात आलं.
लैंगिक गुप्तरोगांवर उपचार करणारं क्लिनिक असल्यामुळे एकंदरच मिडिया मध्येही यावर लिहून येवू लागलं. त्यामुळं मुंबई आणि परिसरातीलच नव्हे तर देशभरातल्या लोकांना विशेष करून लैंगिक गुप्तरोगाचा त्रास असलेल्यांना या ठिकाणी उपचार करून घ्यावेसे वाटले. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातूनच नव्हे तर थेट पंजाब हरियाणातूनही इथं रोगी येत. सर्वसामान्य माणसांसोबत समाजात प्रतिष्ठा असलेली माणसे इथं येवून बरी झाल्याची उदाहरणे आहेत कला , साहित्य आणि मनोरंजन क्षेत्रातील लोक छुप्या पावलाने या क्लिनिक मध्ये दाखल होत. काहींनी आपल्या लैंगिक गुप्तरोगाविषयी ‘ गुप्तता ’ बाळगणं पसंत केलं. तर काहींनी मात्र आपण तिकडे जायचो हे उघडपणे मान्य केलं. या क्लिनिकने जवळपास शतकभर मुंबईकरांच्या लैंगिक आरोग्याची घडी नीट ठेवण्यामध्ये बहुमोलाची कामगिरी केलेला. शतकाच्या उंबरठ्यावर असलेलं कामाठीपु-यातलं हे एसटीडी क्लिनिक सध्या मात्र शेवटच्या घटका मोजतोय. क्लिनिकची दुमजली इमारत अगदी मोडकळीस आली आहे. भिंतींवर पोपडे पडले. छप्पर कधी कोसळेल याचा भरवसा नाही. वैद्यकीय विशेष करून लैंगिक रोगांवरची दुर्मिळ ग्रंथसंपदा असलेलं इथल्या ग्रंथालयाला सध्या लॉक लावलेलं दिसतं. क्लिनिकच्या आजच्या दुरवस्थेमागे प्रशासकीय अनास्थेसोबतच झपाट्याने बदललेली परिस्थितीही कारणीभूत आहे.

चित्रपट संगीतातले अमर पिंपळपान

मराठी चित्रपटगीतांना कर्णमधूर संगीत देऊन संगीतप्रेमींच्या मनावर कायमची मोहनी घालणारे दिवंगत संगीतकार दत्ता डावजेकर. संगीत क्षेत्रात डीडी म्हणून संगीतरसिकांना माहीत असलेले डावजेकर हे भारतात तयार झालेल्या पहिल्या सिंथेसायझरचेही जनक आहे , हे मात्र अनेकांना ठाऊक नसेल.
डावजेकरांनी तयार केलेला हा अस्सल भारतीय सिंथेसायझर चित्रपट संगीत क्षेत्रातले ज्येष्ठ अरेंजर केरसी लॉर्ड यांनी मोठ्या प्रेमाने जतन केला आहे. या सिंथेसायझरच्या जन्माची कहाणी मात्र न्यारी आहे. त्या आठवणीत रमलेले केरसी लॉर्ड सांगतात की सत्तरच्या दशकात राहुलदेव (आरडी) बर्मन हे सर्वाधिक प्रयोगशील संगीतकार म्हणून ओळखले जायचे. लोकसंगीतासोबतच त्यांनी इलेक्ट्रॉनिक वाद्यांच्या मदतीने दिलेले संगीत चांगलेच हिट होत होते. त्यामुळे आम्ही सतत नवनवीन ट्यून्सच्या शोधात असायचो. या ट्यून्स तयार करण्यासाठी आम्हाला नवनवीन इलेक्ट्रॉनिकवाद्यांची गरज भासायची. ही आहे १९७१ची गोष्ट. त्यावेळी इलेक्ट्रॉनिक वाद्ये भारतीय बाजारात सहज मिळत नव्हती.
अमेरिकन मूग सिंथेसायझर बाजारात येण्यापूवीर् खोलीभर पसरतील एवढे अवाढव्य आकाराचे सिंथेसायझर असायचे. अशावेळी आपणच सिंथेसायझर बनवला तर ? असा विचार माझ्या मनात चमकून गेला. या विचार येताक्षणीच माझ्यासमोर पहिले नाव आले ते दत्ता डावजेकरांचे. कारण संगीत आणि इलेक्ट्रॉनिक वाद्य या दोन्ही विषयांचे सखोल ज्ञान व त्यावर हुकमत असणारे डीडी एकटेच होते.
त्यावेळी डीडी गिरगावात तर केरसी लॉर्ड गँट रोडला राहत. मग केरसींनी डीडींना गाठले. काय काय इलेक्ट्रॉनिक सामग्री लागेल , याची दोघांनी यादीच केली. डीडींनी ऑपेरा हाऊसच्या माकेर्टमधून सारी सामग्री आणली. डीडी कामाला लागले आणि सहाव्याच दिवशी भारतातल्या पहिल्या देशी सिंथेसायझरचा जन्म झाला. ही आगळी जन्मकथा सांगून केरसी म्हणाले की डीडींनी बनविलेला सिंथेसायझर घेऊन आम्ही ' पंचमदां ' कडे गेलो. तो सिंथेसायझर पाहून आरडी खूषच झाले. तो डीडींनी बनवला आहे , म्हटल्यावर तर त्यांनी आदराने मस्तक झुकवले. तेव्हा हे अफलातून वाद्य बनवण्यासाठी डीडींनी केवळ पाचशे रुपये खर्च केला.
डीडींचा स्पर्श झालेल्या या वाद्याचा वापर नंतर मी निदान तीनशे गीतांच्या संगीतात तरी केला. डीडींनी तयार केलेला हा ३६ वर्षांपूवीर्चा सिंथेसायझर आजही केरसी लॉर्ड यांच्या संग्रहात मोलाच्या जागी आहे. आता तर इलेक्ट्रॉनिक वाद्यांची प्रचंड मांदियाळी तयार झाली आहे. त्यांचे आकार , त्यांची कार्यक्षमता आणि सर्वच प्रकारच्या संगीतात अशा वाद्यांचा होणारा वापर हे सारे आमूलाग्र बदलून गेले आहे. तरी एका महान संगीतकाराने तयार केलेले हे पहिलेवहिले वाद्य म्हणजे चित्रपटसंगीताच्या इतिहासातले पिंपळपान आहे. ते पिंपळपान केरसी लॉर्ड आजही जीवापाड जपून आहेत.