ज्येष्ठ साहित्यिक बाबूराव बागूल यांच्या निधनाने मराठी साहित्यातला हिरा निखळला. समाजातल्या दुर्लक्षित, शोषित, पिडितांच्या भावभावनांचं आपल्या कथा कादंब-यांमधून जिवंत चित्रण त्यांच्या साहित्यात आहे. हे साहित्य इंग्रजीत अनुवादित झालं असतं, तर त्याला साहित्याचं नोबेल नक्कीच मिळालं असतं. जागतिक दर्जाचं असं हे लिखाण आहे. १९६० च्या दशकात मराठी साहित्यात दलित साहित्याचा प्रवास सुरू झाला. त्या प्रवाहाच्या जडणघडणीत बाबूरावांची भूमिका फार मोलाची आहे. बाबूरावांच्या साहित्यावर मार्क्सवादाचा प्रभाव होता. त्यांनी लिहिलेल्या कथा, कादंब-या, वैचारिक लिखाण हे तर फार उच्च दर्जाचे होते. ‘जेव्हा मी जात चोरली,’ ‘मरण स्वस्त होत आहे,’ हे कथासंग्रह तर सगळ्या मराठी साहित्याचे मापदंड ठरावे असेच आहे. त्यांनी लिहिलेली ‘कोंडी’ ‘आंबेडकर भारत १ आणि २’ हे जातककथांच्या रूपात मांडलेले बाबासाहेबांचे चरित्र तसेच ‘वेदा आधी तू होतास’ हा कवितासंग्रह तर माझ्या विशेष आवडीचा आहे. बाबूरावांच्या लेखनात एक समान सूत्र होतं. समाजातले दुर्लक्षित, शोषित, पिडित आणि सर्वसामान्य जनतेच्या भावभावनांचे जिवंत चित्रण बाबूराव बागुलांनी आपल्या साहित्यातून केले आहे. बाबूराव बागूल यांच्या कथा कादंब-या या मराठी साहित्याच्या मापदंड होत्या, असं माझे मत आहे.सर्वसामान्यपणे मराठी साहित्याच्या तुलनेत बागुलांच्या साहित्याचा दर्जा फारच वरचा होता. निर्विवाद नोबेल पुरस्कार मिळवण्याचा हा दर्जा होता. बाबूरावांचे साहित्य इंग्रजीत अनुवादित झाले असते तर साहित्याचा नोबेल नक्कीच मिळालं असतं. पण इथे त्याची दखल हवी तशी घेतली गेली नाही. पुणे विद्यापीठाने आपल्या परीने त्यांना सलाम केला होता. १० फेब्रुवारीला आम्ही त्यांना जीवनसाधना पुरस्कार त्यांच्या घरी जाऊन दिला होता. तो माझ्यासाठी मोठ्या समाधानाचा क्षण होता. व्यक्तिगत पातळीवर माझा बाबूरावांशी अनेक वर्षापासूनचा परिचय होता. त्यांच्यासोबत झालेल्या प्रत्येक भेटीतून नवीन शिकता आलं. तीन महिन्यांपूर्वीच मी आणि अर्जुन डांगळे त्यांना भेटायला नाशिकला गेलो होतो. त्यांची तब्बेत बरीच खालावली होती. तरीही त्यांनी मला ओळखलं. माझा हात हातात घेऊन हळूच दाबला, बोलता येत नव्हतं तरी त्यांनी भावना कळवल्या. बाबूराव बागूल गेल्याने व्यक्तिगत पातळीवर माझं फार मोठं नुकसान झालं आहे.
(डॉ. नरेंद्र जाधव)

No comments:
Post a Comment